श्री स्वामी समर्थ संपूर्ण माहिती । Shree Swami Samarth in Marathi

Shree Swami Samarth in Marathi : कोण होते श्री स्वामी समर्थ? कुठून आले श्री स्वामी समर्थ? खरेच श्री स्वामी समर्थ हेच नृसिंह सरस्वती होते का? काय होत्या श्री स्वामी समर्थांच्या लीला? 

अक्कलकोट येथिल वास्तव्यात काय काय चमत्कार केले श्री स्वामी समर्थ महाराजांनी? त्यांच्या वास्तव्याच्या साक्ष देणाऱ्या वास्तू अक्कलकोट येथे आहेत का? कधी प्रकटले श्री स्वामी समर्थ? कधी पुर्ण झाले स्वामीचे अवतार कार्य? अक्कलकोट येथे गेल्यावर कोणत्या ठिकाणांना भेटी द्याल? तेथें राहण्या खाण्याची काय व्यवस्था आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणुन घेणार आहोत आजच्या लेखात. चला तर पाहू या कोण होते श्री स्वामी समर्थ? 

Shree Swami Samarth in Marathi

अगदी लहापणापासून स्वामी समर्थांच्या बाबत मनात कुतुहल निर्माण झाले होते. माझ्या बाबांच्या सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव ‘ श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन कंपनी ” असे होते. तेव्हापासून मनात प्रश्न निर्माण झाला होता की कोण बरे हे स्वामी समर्थ? यांचा जन्म, बालपण, शाळा कुठली असेल? यांचे ईतके भक्त, ईतके अनुयायी, ईतके मठ का आहेत? 

  स्वामींचा साक्षात्कार आणि अनुकंपा झाल्याचा अनेकांचा अनुभव मी ऐकला होता. त्यापैकी अनेकजण माझ्या जवळचे मित्र मैत्रिणी नातेवाईक आहेत. तेव्हा स्वामींच्या शक्तीचा भक्तीचा मागोवा घेत अनेकानेक पुस्तके मी वाचली. मिळेल तिथून महिती मिळवली आणि मी स्वामी समर्थमय झालो. ही एक प्रकारे स्वामी सेवाच माझ्या हातून नकळत घडली. स्वामींची महिमा अगाध आहे. 

अध्यात्मिक पार्श्वभूमी

असे मानले जाते की श्रीपाद वल्लभ यांचे शिष्य अक्कलकोटचे श्री नृसिंह सरस्वती महाराज यांनी १४५९ साली शके १३८०, माघ महिन्यातील वद्य प्रतिपदेस गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन केल्या.  ( येथे सगुण निर्गुण भेद जाणुन घेणे महत्वाचे आहे) त्यानंतर ते आपले जीवन चरित्र आवरते घेऊन श्री शैलम यात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनात अदृश्य झाले. तेथे त्यांनी सुमारे तीनशे वर्षे कठोर तप केले. इतक्या वर्षात त्यांच्या भोवती वारुळे निर्माण होणे साहजिकच होते. परंतू महापुरुषांना जेव्हा जेव्हा असे वाटते की इहलोकातील आपले कार्य अजून पुर्ण झाले नाही. त्यावेळी काहीतरी निमित्त होऊन त्यांच्या अपूर्ण कार्याला गती मिळते.

जसे एकनाथ महाराजांच्या स्वप्नात येऊन ज्ञानदेव माउलींनी आपल्या गळ्याला मुळी लागल्याचा दृष्टांत दिला होता. तसेच निमित्त होऊन लाकूडतोड्या उध्दव या कर्दळी वनात लाकडे तोडत असताना त्याची कुऱ्हाड निसटून ध्यानस्थ बसलेल्या नृसिंह सरस्वती महारांच्या भोवती वाढलेल्या वारुळावर जाऊन आदळली. कुऱ्हाड वारूळ फोडून महाराजांच्या मांडीला लागली. वारुळातून भळभळा रक्त वाहू लागले. ते पाहून उध्दव घाबरला. त्याची भीतीने गाळण उडाली.

मात्र वारुळातून भक्त वत्सल दिव्य तेजःपुंज  महाराज श्री स्वामी समर्थ प्रकटले. त्यांनी उद्धवला अभय आणि आशीर्वाद दिला. आणि स्वामी समर्थ पुन्हा भक्तांच्या उद्धारासाठी आपले अवतार कार्य सूरू केले . तेथून त्यांनीं संपूर्ण भारतभर भ्रमण करीत विवीध तिर्थांना भेटी दिल्या. 

  फिरता फिरता श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ  करीत सोलापुरास मंगळ वेढा येथे आले. येथिल भक्तांना अध्यात्माची शिकवण देत  मार्गदर्शन केले. मनाला दुःखमुक्त करणे म्हणजेच मोक्षाची प्राप्ती होय.

Shree Swami Samarth – प्रकट दिन

मंगळ वेढा येथून अक्कल कोट येथे येऊन येथील खंडोबा मंदिरात वास्तव्य करून राहीले. चैत्र शुद्ध द्वितीया शके १७७८ अनल नाम सवत्सर,  रविवार दिनांक ६ एप्रिल १८५६ या दिवशी स्वामी प्रकट झाले, तो दिवस स्वामी भक्त मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. 

पुढे स्वामी याच ठिकाणी बावीस वर्षे भक्तांचा उद्धार करीत राहीले. त्यांच्या लीला अगाध आहेत. 

अवतार कार्य

श्री स्वामी समर्थ महाराज यांनी आपल्या २२ वर्षाच्या अवतार काळात अनेकानेक भक्तांचे कल्याण केले. अनेक भक्तांवर अनुकंपा करुन त्यांना संकटातून बाहेर काढले होते याचे भक्कम पुरावे म्हणजेच संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर आज जागोजागी उभे असलेले स्वामी समर्थ यांचे मठ होत. भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या भक्ताला स्वामी अलगद पैलतीरी नेवून सोडतात याचा प्रत्यय आजही भक्तांना येतो आहे. त्यांच्यावर अनुकंपा झालेल्या अनेक भक्तांनी अक्कलकोट येथे बांधलेले मठ त्यांच्या अवतार कार्याची साक्ष देतात. 

कार्य समाप्ती

रविवार तारीख ३० एप्रिल १८७८ , चैत्र वद्य त्रयोदशी, शके १८००, बहुधान्य नाम संवत्सर या पवित्र दिवशी अक्कलकोट येथिल वटवृक्ष समाधी मठ स्थानी दुपारच्या शुभ मुहूर्तावर आपले अवतार कार्य समाप्त केले.  त्यानंतर त्यांना चोळाप्पा यांच्या घराजवळ श्रध्देने समाधीस्थ केले. परंतू त्यांच्या अचेतन वास्तव्याचा साक्षात्कार आजही अनेक भक्तांना होत असतो. ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” हे स्वामी वचन अनेक जीवांना धीर देत भवसागर पार करण्यास मार्गदर्शन करते आहे. 

श्रीक्षेत्र अक्कलकोट महती

Shree Swami Samarth महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली अक्कलकोट नगरी आज स्वामींच्या भक्तांसाठी एक पवित्र तीर्थस्थान आहे. अनेक रंजलेगांजले भाविक भक्त आपले दुःख, वेदना, चिंता, भय, भिती , आपदा, विप्पत्ती, दुर्धर आजार यातून सुटका मिळवण्यासाठी स्वामींना शरण जाऊन त्यांच्या दर्शना साठी अक्कलकोट येथे येतात. 

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील मठ. स्वामी समर्थांच्या वास्तव्याच्या खुणा 

१) बाळाप्पा मठ – श्री गुरू मंदीर ,  अक्कलकोट. 

 वयाच्या तिशीतील तरूण सराफ बाळाप्पा सर्व संग परित्याग करुन धारवाड येथून गुरू दर्शनासाठी अक्कलकोट येथे येवुन स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले तेव्हा स्वामींनी त्यांना अनुग्रह दिला. आपल्या आत्मलींग पादुका त्यांच्या हवाली करुन मठ बांधण्याची आज्ञा करुन शुभ आशीर्वाद दिला. हाच अक्कलकोट येथिल बाळाप्पा मठ. या मठात समर्थांचा दंड, कंठमणी, छडी, माळ या पवित्र वस्तू ठेवल्या आहेत. आज घडीला मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी समर्थ जयंती असे धार्मिक उत्सव  उत्साहाने साजरे होतात.

२) वटवृक्ष संस्थान मठ, अक्कलकोट. – श्री स्वामी समर्थ मंदीर.

स्वामी समाधिस्थ होण्यापूर्वी शिष्य ज्योतिबा पांडे यांनी आपल्या गुरुच्या गमनानंतर आपले कसे होइल अशी व्याकूळ शंका व्यक्त केली तेव्हा, ” मी सदैव वटवृक्षाखाली असेन. माझे स्मरण करताच तुम्हाला आशीर्वाद मिळेल. ” असे वचन दिले. 

 ज्योतिबा पांडे यांनी स्वामी समर्थ ज्या वटवृक्षाखाली वास्तव्यास होते तेथे आपली सर्व संपत्ती विकून स्वामींचे मंदीर बांधले. समर्थांच्या सचेत सानिध्यात पंधरा वर्ष व अचेत सानिध्यात ४१ वर्षे स्वामींची सेवा केली. याच मंदीराच्या समोर सभागृहात आज जोतिबाची मुर्ती स्वामी सेवेत उभी आहे. स्वामी समर्थ वटवृक्ष संस्थान तर्फे या मठाची व्यवस्था पाहिली जाते. येणाऱ्या भाविकांची राहणे, खाणे, पूजा नैवद्य, अभिषेक वगेरे करण्याची व्यवस्था या संस्थांना तर्फे पाहिली जाते. या मठात समर्थांचा पादुका आहेत.  गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव या मठात उत्साहाने साजरे होतात.

३) श्रीस्वामी समाधी मठ, बुधवार पेठ, अक्कलकोट

अक्कलकोट हे मुळात भोसल्यांचे संस्थान. या संस्थानचे प्रशासक विंचूरकर यांना श्वेत कुष्ठरोग झाल्यावर ते स्वामींच्या दर्शनास गेले . स्वामीची कृपादृष्टी झाल्याने  त्यांनी स्वामींच्या चरणी हिऱ्याची अंगठी अर्पण केली. ती अंगठी विकून स्वामींचे भक्त चोळप्पा यांनी आपल्या घराजवळ मठ बांधिला. या मठात समर्थांच्या दिव्य पादुका आहेत. चोळप्पा यांच्या घरी  बरीच वर्षे स्वामींचे वास्तव्य होते.

४) जोशीबुवांचा स्वामी मठ, अक्कलकोट.

     अक्कलकोट येथील बडी असामी चिंतोपंत टोळ हे स्वामीचे मोठे भक्त होते. ते नियमाने स्वामींच्या चरणी तुळसिपत्रे वाहत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन स्वामींनी त्यांना आपल्या पावलांचे ठसे असलेला पाट दिला. टोळ यांनी या पाटावर तुळसिपत्रे वाहून आयुष्यभर स्वामी सेवा केली. तो स्वामींच्या अस्तित्वाची खूण सांगणारा पाट या जोशी मठात होता. हल्ली तो पाट गुरु मंदीरात असल्याचे सांगतात.

५) शंकरराव राजेरायन यांचा मठ, अक्कलकोट

हैदराबाद संस्थनातील श्रीमंत जहागीरदार शंकरराव राजे यांना झालेला क्षय कोणत्याही उपायांनी बरा होत नव्हता तेव्हा ते स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांचा क्षय आणि ब्रम्हसमंध बाधा स्वामींच्या कृपेने दूर झाली. स्वामींच्या आज्ञेने राजे यांनी मोठी रक्कम खर्चून जून्या राजवाड्याजवळ हा मठ बांधला. येथे स्वामींच्या पादुका आहेत. 

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथिल काही खास ठिकाणे 

१ ) जंगमांचे शिव मंदिर

या मंदिरातील शिवलींगावर स्वामींनी शेणी रचून आग पेटवली होती. तेव्हा जंगम अतिशय संतापाने स्वामींना मारायला धावले होते. तिन दिवस सतत अग्नी पेटलेला होता. तरीही शिवलिंग सुरक्षीत राहीले व ते अधिक तेजस्वी झाले होते. तेच हे जांगमांचे शिव मंदीर.

२)  मुरलीधर मंदिर

मुंबईहून स्वामी दर्शनास आलेले स्वामींचे एक भक्त मुरलीधर मंदीरात 

स्वामींची वाट पहात बसले होते. तेव्हां स्वामींच्या समोर दिवे लावणाऱ्या एका श्रीमंत भक्तास  स्वामी म्हणाले  ”माझ्या समोर दिवे पेटवण्याऐवजी माझा सुत काळोखात बसला आहे तेथे रोषणई कर.” 

याच स्वामिसुताने गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन  केला. 

३) शेखनूर दर्गा

 स्वामी समर्थ महाराज बरेचदा हया दर्ग्यावर जात असत. मन्नत मागणाऱ्या  कित्येक भक्तांना स्वामी या दर्ग्यावर चादर चाढवण्यास सांगत. तिथल्या फकीराना भोजन देण्याचे सुचवीत.

४)  मालोजीराजांचा किल्ला

किल्ल्याच्या महा दरवाजाच्यावर असलेल्या गणपतीच्या मुर्तीपर्यंत स्वामींचा हात सहजच पोहोचत असे. इतक्या उंचावर असलेल्या या मुर्तीपर्यांत कुणाचाही हात सहजासहजी पोहचत नाही. 

५) शिवपुरी – येथे  रोज सकाळ संध्याकाळी म्हणजे 

सुर्योदय आणि सुर्यास्त ह्या वेळी  अग्निहोत्र होत असते . अग्निहोत्र कसे करावे? अग्निहोत्र म्हणहजे काय? याबाबत येथे सविस्तर महिती सांगितली जाते. शिवपुरी येथे अग्निहोत्रात सहभाग घ्यायचा असल्यास या ठिकाणी सुर्यास्ताच्या  तासभर आधी पोहोचणे आवश्यक आहे.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर चित्रपट व मालिका

Shree Swami Samarth महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट व दूरदर्शन मालिकांची निर्मिती झाली आहे. त्यातून लोकांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कार्याची ओळख होण्यास मदत मिळते. 

 ’देऊळ बंद’ हा चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता.  मोहन जोशी यांनी स्वामींची भुमिका साकारली होती.  प्रवीण तरडे व प्रणीत कुलकर्णी यांनी  हा चित्रपट दिग्दर्शीत केला होता.

२०१२ साली ’कृपासिंधू श्री स्वामी समर्थ’ ही शतकोत्तर भागांची मालिका ’मी मराठी’ या दूरदर्शन वाहिनीवर प्रक्षेपित झाली होती. 

 २००४ साली  “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

 २०२० साली  “जय जय स्वामी समर्थ” ही मालिका  कलर्स मराठी या वाहिनीवर प्रक्षेपित झाली होती.

Shree Swami Samarth यांच्या दर्शनास कसे जावे

मुंबई पासुन अक्कलकोट अंतर अंदाजे ४५० किलोमीटर आहे. 

मुंबई पासुन नियमित बस व रेल्वेच्या गाड्या धावतात. 

 सोलापूर पासून ३५ कि. मी. अंतरावर अक्कलकोट आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी  छान भक्त-निवास  आहे. अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ वाजता व रात्री ८ वाजता महाप्रसादाची व्यवस्था आहे. 

Conclusion – Shree Swami Samarth in Marathi

 माणसाच्या आयुष्यात इतकी दुःखे, त्रास, विवंचना निर्माण झाल्या आहेत की त्या सोसणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशावेळी आपल्या मनावरचा आणि आत्म्यावरचा भार टाकता येईल असे एखादे आश्वासक श्रद्धास्थान मनाला आवश्यक वाटते. या कलियुगातील गतीशील आयुष्यात केवळ दर्शनाने मनःशांती मिळावी असे श्रद्धास्थान म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आहेत अशी अनेक भक्तांची ठाम श्रद्धा आहे. म्हणूनच गावोगावी श्री स्वामी समर्थांच्या मठाचे मोठे जाळे आपलयाला पहावयास मिळते आहे. आपण सारेच या स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचे शुभाशीर्वाद प्राप्त करुन घेऊ या.

आम्हाला आशा आहे कि श्री स्वामी समर्थ संपूर्ण माहिती । Shree Swami Samarth in Marathi हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.

श्री स्वामी समर्थ. !

हे देखील वाचा संत ज्ञानेश्वर संपूर्ण माहिती । Sant Dnyaneshwar Mahiti Marathi

1 thought on “श्री स्वामी समर्थ संपूर्ण माहिती । Shree Swami Samarth in Marathi”

Leave a Comment