सिंधुताई सपकाळ संपूर्ण महिती | Sindhutai Sapkal Information in Marathi

Sindhutai Sapkal Information in Marathi : अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या लेखातून आपण करणार आहोत. पद्मश्री पुरस्कारविजेत्या, सामाजिक कार्यासाठी ७५० पुरस्कार मिळवणाऱ्या सिंधुताई कोण होत्या ? त्यांनी काय काम केले म्हणुन त्यांना अनाथांची माय म्हटले जाते? सिंधुताई ना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कोणकोणते पुरस्कार लाभलेले आहेत? त्यांच्या पश्चात त्यांच्या सामाजिक कार्याचा धुरा कोण सांभाळत आहेत? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणुन घेणार आहोत आजच्या लेखातून. चला तर सूरवात करु या Sindhutai Sapkal Information in Marathi आजच्या लेखाला. सिंधुताई सपकाळ.

Sindhutai Sapkal Information in Marathi

जन्म आणि बालपण

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी वर्धा जिल्ह्यातील पिम्री मोघे गावात एका अत्यंत गरीब घरात झाला.

अगदी मागास म्हणावे असे हे गाव. कोणत्याही सोई सुविधा गावात उपलब्ध नव्हत्या. शाळा आरोग्य वगैरे क्षेत्राची ओळखही या गावाच्या भाग्यात आलेली नव्हती.

सिंधूताईंच्या वडिलांचे नाव अभिमन्यू साठे होय. ते गुरे पालनाचा व्यवसाय करीत. त्यांच्या जन्माने आई वडिलांना मुळीच आनंद झाला नाही. त्यांना मुलगी नकोच होती. वर्ध्या सारख्या मागास ग्रामीण भागात मुलीचा जन्म म्हणजे घरच्यांना, आईवडिलांना भार वाटायचा. नको असलेली मुलगी जन्माला आली म्हणुन तिचे नाव चिंधी ठेवले. चिंधी या शब्दाचा अर्थ जून्या पुराण्या फाटक्या कपड्याचा लांबलचक तुकडा. असे नाव खूपच अपमानास्पद ठरते. सिंधुताईना आई वडिलांचे प्रेम मिळालेच नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. किंबहुना आयुष्यात स्वकियांकडून त्यांना प्रेम मिळालेच नाही.

चिंधी थोडी मोठी झाली तसे घरची गुरे राखायची जबाबदारी तिच्यावर पडली. जवळपास शंभर गुरे घेऊन चिंधी रानात जायची. ढोरे रानात सोडुन चींधी शाळेत जाऊन बसायची. तीला शिक्षणाची आवड आणि बुध्दीची देणगी होती. पण घरात खायचेच वांदे आणि शिक्षणाचा तिटकारा अशा परिस्थतीमध्ये कोण त्यांना शाळेत घालणार? अशाही परिस्थितीत चिंधी चौथी पर्यंत शिकली. या अक्षर ओळख शिक्षणाचा त्यांना आयुष्यात खूप फायदा झाला.

लग्न आणि संघर्ष

माईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ याच्याशी झाला. नवव्या वर्षी लग्न लागले आणि शाळा सुटली. त्यामुळे सिंधूताईंच्या शिक्षणाला वाव मिळाला नाही. शाळा चौथीपर्यंत झाली आणि थांबली ती थांबलीच.

चौथी, एवढीच त्यांच्या शिक्षणाची ओळख राहिली.

बालपणी आई-वडिलांच्या घरी सुख मिळालं नाही, किमान लग्नानंतर सासरी तरी सुख मिळेल अशी आशा त्यांना होती. पण माईंच्या नशिबात सुख नव्हतेच. विधात्याने त्यांना वेगळ्याच कार्यासाठी जन्मास घातले होते. त्यामुळे निम्मित निर्माण करणे परमेश्वराचे काम होते.

नवऱ्याच्या घरी माईंना प्रचंड सासुरवास सोसावा लागला. शेण गोठा शेती वाडी लाकूडफाटा रान मळा असे करता करता सासू सासरे नवरा यांच्या शिव्या प्रसंगी मारही खावा लागे. हे सगळे सोसत असतानाही माई रस्त्यात सापडलेले कागदाचे कपटे घरी आणून वाचत बसत. अडाणी आणि शिक्षणाशी अजिबात संबंध नसलेल्या घरात बाईंची ही कृती मोठा गुन्हा ठरत असे. ” कोणाचे प्रेमपत्र वाचते?” असे म्हणुन त्यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला जात असे. त्यांच्या या वाचन वेडामुळे त्यांनी अनेकदा मारही खाल्ला आहे.

अशाच परिस्थितीत अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला.

गुरे वळणे हाच गावचा मुख्य व्यवसाय. गावात शेकडो गुरे होती. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. गावचे जमीनदार दमडाजी असतकर यांना या व्यवहारात हप्ता मिळायचा. या लिलावाला माईंनी विरोध केला. लढा उभारला. गावातल्या बायांना त्यांचा अधिकार मिळवून दिला. त्यामुळे दमडाजी दुखावला व चींधीच्या पोटात असलेले बाळ आपलेच आहे अशा वावड्या गावात उठवल्या. नवऱ्याने त्यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला. त्यांना घरातून हाकलून दिले.

या बाबत एका व्याख्यानात बोलताना सिंधुताई म्हणाल्या, “मला गरोदरपणातच नवऱ्याने पोटावर लाथ घालून हाकलून दिलं. त्यावेळी मी २० वर्षांची होते. गरोदरपणातही माहेरच्या लोकांनी स्वीकारलं नाही. आईनेही हाकलून लावलं.”

सासरहून हाकलून लावले तर मुलीला मोठा आसरा, दिलासा असतो तो माहेरचा. मात्र माईंना माहेरचा आसरा सुध्दा मिळाला नाही. ” लग्न लाऊन दिले तेव्हाच तू आमच्यासाठी मेली. पुन्हा माहेरी पाय ठेवायचा नाही ” अशा शब्दात स्वतच्या जन्मदात्या आईने वाटेला लावल्यानंतर सिंधुताईनी गाव सोडले. ती रात्र त्यांनी गावातली स्मशानभूमीत काढली. रात्री भुकेने पोटात कावळे ओरडू लागले तेव्हां स्मशानात पिंडासाठी ठेवलेले पीठ घेऊन स्मशानातील दगडावर भाकर थापली आणि चीतेच्या आगीवर भाकर शेकवून खाल्ली. या प्रसंगाबद्दल बोलताना माई म्हणतात,” माणसाला जगण्याची इच्छा राहिली नाही की मरणाची भिती नाहीशी होते. त्यामुळे मला स्मशानातील भुतांची भिती वाटली नाही पण समाजातील जीवंत माणसांची भिती माझ्या मनात बसली होती.”

माईंच्या मनात आत्महत्येचे विचार अनेकदा आले पण आपल्या पोटात वाढणाऱ्या जीवाचे जीवन संपवण्याचा आपलयाला अजिबात अधिकार नाही असा विचार करून मी आत्महत्येचा विचार बदलला असे माई सांगतात.

अशा परिस्थितीत सिंधुताई जवळच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागून पोट भरू लागल्या. त्यांनी आपले बाळंतपणही रेल्वे स्टेशनवर स्वतःच केलं. बाळाची नाळ दगडाने ठेचून स्वतःच तोडली. अशा कठीण प्रसंगाना सिंधूताई धैर्याने सामोऱ्या गेल्या.

बाळ जन्माला आले तरी भीक मागून पोट भरण्याशिवय त्यांच्याकडे पर्याय नव्हता.

या प्रसंगाबद्दल एका व्याख्यानात त्या म्हणाल्या , “मी दहा दिवसांचं बाळ घेऊन रेल्वेत भीक मागत होते. खरा माझा परिचय तोच आहे. मला पतीने तर हाकललंच होतं. पण आईनेही हाकलून दिलं. दहा दिवसांची ओली बाळंतीण. वय वर्षं २०. शिक्षण चौथी पास, अंगावर एकच पातळ, त्यालाही दोन चार गाठी मारलेल्या. मला जगायचं होतं. मला मरायचं नव्हतं.”

सामाजिक कार्याची प्रेरणा

रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे गाड्या यातून भीक मागत असताना त्यांनीं जीवनाची विवीध रूपे पाहिली. जगण्याचा संघर्ष अनुभवला. रेल्वे गाडीत भीक मागत असताना टीसीने टिकीट विचारले तर एका गाडीतुन उतरुन दुसऱ्या गाडीत चढायचे. प्लॅटफॉर्मवर झोपताना कोणाच्या नजरेला पडू नये म्हणुन आडोशाला लपून तरीहि सावध झोपायचे. प्लॅटफॉर्म वरच्या नळाचे पाणी पिऊन तहान भागवायची.

असे करत असताना त्यांनी पाहीले की असे लाजिरवाणे जिणे जगणाऱ्या आपन एकट्याच नाहीत. इतर कितीतरी लहान लहान अनाथ जीव स्टेशनवर भीक मागून पोट भरत आहेत. प्लॅटफॉर्म वर झोपून रात्र घालवत आहेत. सार्वजनिक नळाचे पाणी पिऊन तहान भागवत आहेत. या कोवळ्या जीवांचे भवितव्य काय? यांना कोण देईल आईंचे प्रेम? यांना कोणाकडून मिळावे बापाचे संरक्षण? हे भारताचे भावी नागरीक, भारताचे भवितव्य आहे. यांच्यासाठी आपणच काहितरी केले पाहिजे.

एक अनाथ दुसऱ्या अनाथांचा नाथ होऊ शकतो. यांना आईचे प्रेम आणि बापाची माया देऊ शकते. असा विचार डोक्यात आल्यावर त्यांनी या मुलांना जवळ घेऊन त्यांचा सांभाळ करायचा ठरवले. प्लॅटफॉर्म वरच्या सर्व अनाथ मुलांना जवळ घेऊन त्यांचा सांभाळ करण्याचे काम त्यांनी रेल्वस्थानकापासून सूरू केले. त्यांच्या सामाजिक कार्याचा शुभारंभ येथूनच झाला. चिंधी अनाथ मुलांच्या अंगावर मायेचे उबदार पांघरून झाली. अनाथांचा आधार होऊ लागली.

सामजिक कार्य आणि संघटना

रेल्वे स्टेशनवर मुलांना आधार देणे सूरू असतानाच कोणाला अनाथ मुलं सापडले किंवा नको असलेली मुले लोकं सिंधूताईंच्या पदरात टाकून निघून जाऊ लागली. अशात त्यांची जबाबदारी वाढत चालली असताना त्यांच्या मनात वीचार येऊ लागले की नुसते पोटापाण्याचा प्रश्न मिटवून या अनाथ मुलांची समस्या सुटणार आहे का? यांच्यासाठी भरीव काहितरी केले पाहिजे. याच्या शिक्षणाची सोय करून त्यांच्या भवितव्याची तरतुद केली पाहिजे. याच विचारातून

पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावी बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली बाल सदन स्थापन झाले. अनाथ भटक्या, आई बापांना नको आसलेल्या मुलांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर उभे राहिले. संस्था स्थापन झाली होती तरी त्याचा खर्च भागवण्यासाी सिंधूताई भिक्षाच मागत फिरत होत्या. मग काही सेवाभावी लोकांनी, संस्थांनी सिंधूताई ना मदत करायचा सुरवात केली.

माई मोठया ममतेने या अनाथ मुलांचा न्हाऊ खाऊ करु लागल्या. हे करत असताना आपली स्वतची मुलगी आणि ही अनाथ मुले यांच्यात मायेचा भेदभाव तर पडणार नाही ना? असा विचार डोक्यात आल्यावर सिंधूताई नी आपल्या पोटच्या मुलीला, ममता हिला दगडूशेठ हलवाई गणपती संस्थेच्या माध्यमातून सेवासदन या संस्थेत दाखल केली. ममताचे शिक्षणं आई पासुन लांब त्या संस्थेत सूरू झाले. अनाथ लेकरांच्या सांभाळा साठी स्वतच्या पोटच्या लेकीला लांब ठेवणारी माय, अनाथांची माय झाली.

बाल सदन येथे या अनाथ मुलांचे शिक्षण, आरोग्य, भोजन, कपडे व अन्य सर्व सुविधा देण्यात येतात. या मुलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. साहाय्य पुरवले जाते. तसेच योग्य जोडीदार मिळवून देऊन त्यांचे लग्नही लावुन दिले जाते. आजपर्यंत सुमारे १०५० पेक्षा अधिक अनाथ मुलामुलींचे पुनर्वसन या संस्थेच्या माध्यमातून कऱण्यात आले आहे.

पुढे कामाची जबाबदारी वाढल्यावर त्यांनी बाल निकेतन हडपसर, पुणे. सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा. अभिमान बाल भवन, वर्धा. गोपिका गोरक्षण केंद्र, वर्धा. ममता बाल सदन, सासवड. तसेच सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था इत्यादी संस्थांची स्थापना केली. माईंनी आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी मिळावी या हेतूने ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’ची स्थापना केली.

पुरस्कार – Sindhutai Sapkal Information in Marathi

सिंधूताईंच्या जगावेगळ्या सामजिक कामाची दखल जगाने घेतली. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना आजवर सुमारे ७५० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

२०२१ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देवून गौरिण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाचा २०१२ सालचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्याच वर्षी पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’

तसेच २०१० सालाचा महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार, २०१३ साली मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार , १९९६ साली आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार , डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार, राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, तसेच १९९२ साली श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार, २०१२ सालचा सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार, दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार , डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार , पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरविण्यात आले आहे.

 या पुरस्काराबद्दल बोलताना सिंधूताई म्हणतात, " आयुष्यात जे होते ते चांगले होण्यासाठीच होते. मला माझ्या नवऱ्याने घरातून बाहेर काढले, आई वडिलांनी आसरा दिला नाही. त्यामूळेच आज सिंधूताई जगाची माय झाली. अनाथांची माय झाली म्हणुन माला इतके पुरस्कार इतका मान सन्मान मिळत आहे. " 

मृत्यू

माणूस कितीही लहान असो अथवा महान असो. मृत्यू हे त्याच्या जीवनाची परिपूर्णता असते. भले मृत्यूला कारणे वेगवेगळी असू शकतात

सिंधूताई पाच वर्षापासून डायफ्रामॅटिक हर्निया या आजाराने ग्रस्त झाल्या होत्या. या आजारामुळे त्यांचे डावे फुफ्फुस व्यवस्थितरित्या कार्य करीत नव्हते. २५ नोव्हेंबर २०२१ रोजी पुण्यातील गलॅक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी होती. त्यांची व्यवस्थीत काळजी घेतली जात होती. पण नंतर फुप्फुसाचा संसर्ग वाढला. त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याच दरम्यान त्यांना हृद्ययविकाराचा झटका आला. दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजून १० मिनीटांना त्यांचे पुण्याच्या गॅलक्सी केर या दवाखान्यामध्ये निधन झाले.

सिंधूताईनी महानुभाव पंथाची दिक्षा घेतली होती. महानुभाव पंथाच्या रीवाजाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आले. अनाथांची माय धरणी मातेच्या पदरात चिरनिद्रा घेती झाली.

त्यांच्या पश्चात त्यांचे कार्य त्यांची मुलगी ममता सिंधूताई यांनी समर्थपणे पुढे चालवले आहे.

चित्रपट आणि चरित्र ग्रंथ

सिंधूताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित मी सिंधूताई सपकाळ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तसेच अनाथांची माय हा चित्रपट देखील विशेष लक्ष वेधून घेणारा ठरला होता. त्यांचे आत्मचरित्र देखील उपलब्ध आहे.

Conclusion – Sindhutai Sapkal Information in Marathi

एक अनाथ बेसहारा परित्यक्ता स्त्री आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रखर सहस व परिश्रम यांच्या जोरावर हजारो अनाथांची माय झाली. अनेक अंधारमय जीवांचा दीपस्तंभ झाली. त्यांचे जीवन निराश झालेल्या जीवांच्या आयुष्यात आणले आशा निर्माण करणारे आहे. प्रतेक माणसाच्या आयुष्यात दुःख, वेदना येतातच पण त्या दुःखाचे त्या वेदनेचे भांडवल करून आपण आयुषाकडून काय खरेदी करायचे ते केवळ आपल्या इचछेप्रमाणे करता येते. हिच शिकवण आजच्या लेखातून आपल्याला मिळते.

आजचा लेख सिंधुताई सपकाळ संपूर्ण महिती | Sindhutai Sapkal Information in Marathi | Sindhutai Sapkal Mahiti Marathi आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. लेख आपल्याला आवडल्यास नक्की शेअर करा. आपल्याला अजुन काय वाचायला आवडेल याबद्दल आम्हाला सांगा. आपल्या सूचनांचे आम्ही स्वागत करु.

हे देखील वाचा छत्रपती शिवाजी महाराज माहिती मराठी। Chhatrapati Shivaji Maharaj Biography Marathi

Leave a Comment