रायगड किल्ला माहिती मराठी । Raigad Killa Information in Marathi

Raigad Killa Information in Marathi : ज्याच्या नुसत्या स्मरणाने अंगावर रोमांच उठावे असा भारतातील एकमेव किल्ला म्हणजे रायगड. या किल्ल्याने काय पाहिले नाही? दैदिप्यमान यश, किर्ती, राज्याभिषेक, मराठा साम्राज्याचा तख्त आणि महाराजांची समाधी याच किल्ल्यावर आहे. अशा एकामेवाद्वितिय किल्ल्याबद्दल प्रत्येकाच्या मनात कायम आदर आणि आपुलकी असते. या किल्ल्याला कितीही वेळा भेट दिली तरी मन भरत नाही. म्हनून आम्ही पुन्हा एकदा Raigad Fort Information in Marathi रायगडाच्या भेटीचे नियोजन सुरु केले.

मित्रांनो या लेखा मध्ये रायगड किल्ला माहिती मराठी । Raigad Killa chi mahiti Marathi याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Raigad Fort Information in Marathi

रायगड किल्ला 18°08′24″N 73°15′45″E / 18.1401°N 73.2626°E या अक्षांश रेखांशवर आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून २७००फूट उंचीवर वसलेला आहे.

रायगड किल्ल्यावर कसे जावे | Way to Raigad Killa

मुंबई पासुन अंदाजे अंतर १७०किलोमीटर तर पुण्यापासून अंदाजे अंतर १३० किलोमीटर आहेः. मुंबई, पुण्याहून एस्टी बसेस महाड पर्यंत येतात. महाड येथून किल्ल्याकडे जाणारी बस दिवसभर येजा करित असते. महाड पासुन रायगडाचे अंतर २४किलोमीटर आहे.

आम्ही म्हणजे मी, माझी पत्नी आणि मुलगा असे तिघांनी रायगड भेटीला आमच्या खाजगी कारने जाण्याचे ठरवले तेव्हां आमच्या सामोरं दोन पर्यार होतें. एक मुंबई पासुन खोपोली पर्यंत एक्स्प्रेस हायवे वरून जाऊन मग पाली, भिरा मार्गे निजामपूर माणगाव पर्यंत जावे. मग तेथून पाचड किंवा महाड मार्गे रायगड किल्ला गाठणे.

दुसरा मार्ग म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर महाड पर्यंत जाऊन मग रयगड किल्ला.

मुंबई गोवा महामार्गाची अवस्था अजूनही फारशी चांगली नसल्याने आम्ही खोपोली पाली मार्गेभीरा,निजामपूर, माणगाव, पाचड अशा मार्गाने प्रथम मा साहेब जिजाऊ यांच्या समाधी जवळ पोहोचलो.

समोरच जिजाऊ माँ साहेब यांचा पुतळा पाहून नतमस्तक झालो.

माँ साहेबांना रायगडीचा गार वारा सोसणे कठीण झाले तेव्हा महाराजांनी पाचाड येथे आऊ सहेबांसाठी वाडा बांधला, त्या जीर्ण वाड्याचे विहिरीचे अवशेष आणि इतर वास्तू आजही येथे इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. माँ साहेब जिजाऊ यांनी याच वाड्यात शेवटचा श्वास घेतला.

रोपवे

समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो तेव्हा काहीं तरूण शिवभक्त खांद्यावर भगव्या पताका घेऊन किल्ला चढत जाताना आम्हाला दिसले. आता रोपवे द्वारे सुध्दा किल्ल्यावर जाता येते . रोपवेचे टिकीट मोठ्या माणसांसाठी ३१०₹ व लाहन मुलांसाठी २००₹तिकीट आहे. ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी २०० रुपये , सातवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी ₹१९५/ व आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ₹२२५/ हे दुहेरी फेरीचे टिकीट आहेः हाच दर शालेय शिक्षक व कर्मचारी यांचेसाठी आहे. तिकिटे ऑनलाईन देखील काढता येतात.

आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि मनात किल्ल्याच्या इतिहासाची उजळणी सुरू झाली.

रायगड किल्ल्याचा इतिहास । History of Raigad Killa

Raigad Killa पुर्वी अनेक नवांनी ओळखला जात होता. पाचव्या शतकापासून हा किल्ला शिर्के राजांच्या ताब्यात होता. रायगड किल्ला पूर्वी रायरी, .इस्लामगड, नंदादीप , जंबुद्वीप , तणस , राशिवटा , बदेनूर , रायगिरी , राजगिरी , भिवगड , रेड्डी , शिवलंका , राहीर . पूर्वेकडील जिब्राल्टर अशा विविध नावांनी ओळखला जात होता. परंतू महाराजांनी मे १६५६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला तेव्हा त्यास रायगड हे नाव दिले.

रायगड किल्ल्याबाबत सभासद बखर म्हणते –

“ राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. ”

महाराजांनी जेव्हा जावळीवर हल्ला केला तेव्हा

मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून जाऊन रायगडावर लपला होता. प्रतापराव मोरे विजापुरला पळाला होता. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड महाराजांच्या ताब्यात आला . रायगडाचा किल्ला राजधानी बनवण्यास योग्य व पुरेसा व सुरक्षीत आहे. कोकण आणि घाट या दोन्हीच्या मध्यावर असल्याने महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. जल आणि स्थल दोन्हीं ठिकाणी मर्यादा बसवण्यास हे उत्तम ठिकाण होते.

कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की –

“ शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकीचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’

हे देखील वाचा शिवनेरी किल्ला माहिती मराठी | Shivneri Killa chi Mahiti Marathi

रायगडाच्या इतिहासातील काही महत्वाच्या नोंदी

इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व. ५ गुरूवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली. शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व. २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले.

शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि. ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले.

शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु. ७, इ.स १६ फेब्रुवारी १६८१ या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले. इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. ता. २१ रोजी शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशहाने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावाला आग लावली व लुटालूट चालू केली. पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला. औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले.

शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु. ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि. ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सूर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले. झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ‘इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकीर्दीत मराठ्यांनी पुन्हा रायगड घेतला.

इतिहासाच्या पटातून बाहेर पडलो तेव्हा आम्ही बऱ्याच पायऱ्या चढून वर आलो होतो. पायऱ्यांवर जागोजागी ताक सरबत पाण्याच्या बाटल्या, काकडी चिक्की असे पदार्थ विकणाऱ्या भगिनी आपली दुकाने सावरत बसलेल्या दिसत होत्या.

रायगड किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे | Raigad Fort Information in Marathi

चालता चालता आम्ही किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहू लागलो.

१) खुलबढा बुरुज : पायऱ्या चढताना एके ठिकाणीं एक बुरुज नजरेस पडतो तो खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी पुर्वी ‘चित्‌ दरवाजा’ होता. ज्याचे हल्ली अस्तित्व सुध्दा शिल्लक राहिलेले नाही.

२) नाणे दरवाजा : नाना दरवाजा म्हणजेच छोटा दरवाजा. याच दरवाजातून महाराजांच्या राज्याभिषेकासाठी इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन आला होता. दोन कमानी असलेला हा दरवाजा सुंदर आहे. दरवाजाच्या आत पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. दार बंद करुन ठेवण्यास आडवे लाकूड घालण्यासाठी असेलल्या खोबणी इथे पाहता येतात.

३) मजारमोर्चा : चित्‌ दरवाजाच्या पुढे नागमोडी वळणाच्या रस्त्याला पुढे एक सपाटी लागते.

इथे दोन पडक्या इमारती आहेत . त्यातले एक धान्याचे कोठार आणि दुसरी पहारेकऱ्यांची जागा आहे. येथे मदनशहा यांची समाधी आहे. तेथे एक तोफ आहे. येथून पुढे खडकात खोदलेल्या तीन गुहा आहेत.

४ ) महादरवाजा : महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन कमळ कोरलेले आहेत. ते सुबत्ता आणि शांती याचे प्रतीक असावे. महादरवाजाला एक ७५फूट व दुसरा ६५ फूट ऊंच असे दोन बुरूज आहेत. तटबंदीमध्ये शत्रूवर मारा करण्यासठी उतरती भोके आहेत . यातून उकळते तेल वगैरेही सोडले जात असावे असे वाटते.

महादरवाजाच्या आत पहारेकऱ्यांचा देवड्या आणि राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली दिसते.

५ ) चोरदिंडी : महादरवाजापासून टकमक टोकापर्यंत तटबंदी वरून चालत गेल्यास अगदीं टोकाकडे बुरुजात चोरदिंडी बांधलेली दिसते. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत पायऱ्या आहेत.

६) हत्ती तलाव : महादरवाजातून थोडे पुढे हत्ती तलाव आहे . गडावरील हत्तींच्या स्नानासाठी आणि पाणी पिण्यासाठी या तलावाचा वापर होत असावा.

७) गंगासागर तलाव : हत्तीतलावाजवळ धर्मशाळेच्या इमारती दिसतात. येथे राहण्याची व्यवस्था आहे. येथून दक्षिणेकडे अंदाजे ५० फुटांवर गंगासागर तलाव आहे. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची तीर्थे याच तलावात टाकली. म्हणूनच यास गंगा सागर तलाव म्हणतात. शिबंदीसाठी याचे पाणी वापरले जात होते.

८) स्तंभ : गंगासागर तलावाच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे आहेत त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये या स्तंभांचा उल्लेख आहे, पूर्वी हे स्तम्भ पाच मजली होते असे म्हणतात. ते बारा कोनांचे नक्षीदार स्तम्भ आहेत.

९) पालखी दरवाजा : स्तंभांच्या भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर पालखी दरवाजा लागतो. येथून बालेकिल्ल्यात जाता येतो.

१०) मेणा दरवाजा : पालखी दरवाजाने वर गेल्यावर चढउतार असलेला मार्ग मेणा दरवाजापर्यंत जातो. उजव्या हातास सात राण्यांचे महाल आहेत. मेणा दरवाजातून सुध्दा बालेकिल्ल्यावर जाता येतो.

११ ) राजभवन : राणीमहलांच्या समोर डाव्या हातास दासदासींचे निवास आहेत. या अवशेषांचा मागे भिंतीच्या मध्यभागी आसलेल्या दरवाज्यातून बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर महाराजांच्या महाराजांचे राजभवनाचे दर्शन होते. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

१२) रत्‍नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडील मोकळ्या जागेत एक तळघर आहे, ती रत्‍नशाळा किंवा खलबतखाना असावा.

१३) राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक येथेच झ़ाला, राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन होते.

१४) नगारखाना : सिंहासनाच्या समोर भव्य नगारखाना आहे. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेल्यास किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर पोहोचता येते.

१५) बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की ‘होळीचा माळ’ लागतो . येथे महाराजांचा भव्य पुतळा आहे. पुतळ्यासमोर दोन रांगांमध्ये मोठी बाजारपेठ आहे . या बाजापेठेत दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन्ही रांगांच्या मधुन अंदाजे चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.

१६) शिरकाई देऊळ : महाराजांचा पुतळ्याच्या डाव्या बाजूस शिरकाई मतेचे देऊळ आहे. शिरकाई माता गडावरील मुख्य देवताआहे. शिर्के राज घराण्याची ही कुलदेवता.

१७) जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेच्या पूर्वेकडील उतारावर खालच्या बाजूला जगदीश्वराचे भव्य मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य मूर्ती आहे. मंदिराला भव्य सभामंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस मारुतीरायाची मूर्ती आहे.

मंदिराचा प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांखाली पुढीलप्रमाणे शिलालेख आहे.

‘सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदलकर.’

दरवाजाचा उजव्या बाजूस भिंतीवर एक शिलालेखआहे.

श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते । श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥

याचा अर्थ असा -’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांचा आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’

१८) महाराजांची समाधी : मंदिराच्या बाहेर अष्टकोनी आकारात महाराजांची समाधी आहे. समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक व उजवीकडे दारूची कोठारे आणि बारा टाकी दिसतात.

१९ ) कुशावर्त तलाव : होळी माळाच्या उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ आहे. देवळासमोर नंदी आहे.

२०) वाघ दरवाजा : कुशावर्त तलावाजवळून खाली उतरल्यास वाघ दरवाजाकडे जाता येते.

२१) टकमक टोक : बाजारपेठेच्या समोरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथे दारू कोठाराचे अवशेष दिसतात. उजव्या हाताला खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो. या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.

२२) हिरकणी टोक : गंगासागराचा उजवीकडून पश्चिमच्या वाटेने हिरकणी टोकाकडे जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावरून डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे दिसतात .

२३) रायगडावरील अश्‍मयुगीन गुहा :

पाचाड खिंडीत रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांचा चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात “वाघबीळ’ किंवा “नाचणटेपाची गुहा.’ म्हणतात. पाचाड खिंडीतून चढून वर आले की गुहेचे तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला उघडलेली दिसतात. त्यातून पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता पाहता येतो.

रायगड किल्ल्याची सफर थकवणारी असली तरी प्रचंड ऊर्जा निर्माण करणारी आहे. येथे राहण्या खाण्याची उत्तम सोय आहे. मात्र आम्हाला इथे राहायचे नव्हते म्हणुन किल्ला उतरुन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

Conclusion – Raigad Fort Information in Marathi

महाराजांच्या पावन पदस्पर्शाने पुनित झालेल्या या भूमीची धूळ मस्तकी धारण करावी अशी कर्तबगार आहे. या गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण करणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे प्लास्टिक डबे, पिशव्या ईथे टाकू नका. किल्ल्यांची स्वच्छ्ता राखणे आपले आद्य कर्तव्य आहे. आपला कचरा योग्य ठिकाणीं टाकून आपले कर्तव्य बजावू या.

आम्हाला आशा आहे कि रायगड किल्ला माहिती मराठी । Raigad Killa Information in Marathi हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल.

जय भवानी! जय शिवराय!!

1 thought on “रायगड किल्ला माहिती मराठी । Raigad Killa Information in Marathi”

Leave a Comment