ज्या दिवसापासून देव चार महिन्यांसाठी शयनी जातात म्हणजेच निद्रिस्त होतात तो दिवस म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी.
संपूर्ण देशभर या पवित्र दिवशी व्रत उपासना केली जाते. काय आहेत या मागची कारणे? या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून लाखो भविक येतात. या दिवशी दान दक्षिणा, व्रत वैकल्ये यांना उधाण आलेले असते. कोणत्या कथा दडल्या आहेत या व्रताच्या मागे? काय महत्त्व आहे देवशयनी आषाढी एकादशीचे? ते आज आपण सविस्तर जाणुन घेऊ या आजच्या Ashadhi Ekadashi Information in Marathi लेखातून.
Table of Contents
देवशयनी आषाढी एकादशी | Devshayani Ashadhi Ekadashi Information in Marathi
एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन ।
श्वानविष्ठेसमान । अधम जन तो एक ॥
ऎका व्रताचें महिमान । नेमें आचरती जन ।
गाती ऎकती हरिकिर्तन । ते समान विष्णूशी ॥
अशुद्ध विटालशींचे खळ । विडा भक्षिंती तांबूल।
सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥
शेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग ।
तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥
आपण न वजे हरिकिर्तन। आणिकां वारी जातां जन ।
त्याच्या पापा जाणा । ठेंगणा महामेरु तो ॥
तया दंडी यमदूत । झाले तयाचे अंकित ।
तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥
वरील एका अभंगातून तुकाराम महाराजांनी एकादशीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. एकादशीस काय खावे? काय खाऊ नये? काय करावे? काय करु नये? याचे सविस्तर मार्गदर्शन वरील अभंगातून सोप्या भाषेत केले आहे. एकादशी चुकल्यास किती मोठे पातक घडते याचेही वर्णन वरील अभंगातून तुकाराम महाराजांनी केले आहे.
हा महत्वाचा दिवस हिंदू वर्षात पंधरवड्यात एकदा, महिन्यातून दोनदा आणि वर्षभरात चोवीस वेळा येतो.
आषाढी एकादशी अथवा देवशयनी एकादशी – Ashadhi Ekadashi Information in Marathi
या सर्व चोवीस एकादशीत आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी देवशयनी आषाढी एकादशी चे महत्त्व फार आहे. या एकादशीस मोठी एकादशी म्हणतात.
पुराणानुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या एकादशी पासुन देव शयनी म्हणजेच निद्रिस्थ होतात व ते चार महिने नीद्रिस्थ राहून कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी जागृत होतात. या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात. अनेक भागवत भक्त या काळात योग नियमन करतात. कांदा लसूण, तामसी पदार्थांचे सेवन करणे सोडुन देतात. देव पूजनात हा काळं घालवतात.
पुराण कथा
पुराण कथे नुसार कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो देवापेक्षा शक्तिशाली झाला. त्याच्या भयाने ब्रम्हा विष्णू महेश यांचेसहित सर्व देव त्रिकुट पर्वतावर धात्री म्हणजेच अवळीच्या झाडाखाली एका गुहेत लपून बसले. तो आषाढी एकादशीचा दिवस होता. लपून बसल्यामुळे देवांना अन्न मिळाले नाही देवांना उपवास घडला. पावसाचे दिवस असल्याने देवांना पावसाच्या धारेचा अभिषेक घडला. परंतू अचानकच सर्व देवांच्या श्वासातून एका दैवी शक्तीचा उदय झाला. तिने गुहेच्या दाराशी बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ती शक्ती म्हणजेच एकादशी देवता होय.
भविष्योत्तर पुराणातब्रम्ह देवाने त्याचा पूत्र नारदाला देवशयनी एकादशीचे महत्त्व सांगीतले. तीच गोष्ट श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली.
धर्मनिष्ठ राजा मंडीत याच्या राज्यात तिन वर्षे दुष्काळ पडला. अनेक उपाय करूनही वरुण देव प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा अंगिरस ऋषींनी राजाला देवशयनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. राजाने देवशयनी एकादशी केल्यावर विष्णूच्या कृपेने त्याच्या राज्यात पाऊस पडला.
Ashadhi Ekadashi कसे करावे व्रत
विवीध धार्मिक ग्रंथानुसार देवशयनी एकादशीच्या व्रताचे विवीध नियम सांगीतले आहेत. सामान्य माणसांना सहज करता यावे असे हे व्रत पुढीप्रमाणे करता येईल.
एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला एकच वेळा भोजन करावे.रहायचे. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे . मग विष्णूला प्रिय असलेली तुळशीची पाने वाहुन विष्णुचे म्हणजेच पांडुरंगाचे पूजन करायचे. संपूर्ण दिवस उपवास करावा . रात्री भजन कीर्तन करत जागरण करायचे. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला विठ्ठलाचे नामस्मरण करुन उपवास सोडावा.
दान करावे-या व्रतात ज्ञानदान, पैसे, अन्न, वस्त्र, जल यांचे दान महत्वाचे सांगीतले आहे. साधू संत नेहमी म्हणतात भुकेल्याला अन्न, तहानेल्याला पाणी द्यावे. ‘ शहाणे करून सोडावे सकळ जन. ‘ या ओळीत ज्ञान दानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
ब्रह्मचार्य पालन करावे – या दिवशी ब्रह्मचार्य पालन करावे असे तुकोबारायानी त्यांच्या अभंगातून सांगीतले आहे.
शेज बाज विलास भोग । करि कामिनीशीं संग ।
तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥
व्रत उपावस करणाऱ्यांनी मनावर ताबा ठेवावा. संयम बाळगावा अशी शिकवण या व्रताच्या निमित्ताने संतांनी दिली आहे.
तांदुळ खाऊ नये -पौराणिक कथेनुसार महर्षि मेधा यांचे शरीराचा एक भाग एकादशीच्या दिवशी पृथ्वीवर पडला व त्यापासून भाताची रोपे उगवली. त्यामुळे तांदळात महर्षी मेधा यांच्या शरीराचे अंश म्हणजेच रक्त व मासाचे अस्तित्व आहे असे मानले जाते. म्हनून एकादशीच्या दिवशी तांदूळ खाण्यास मनाई सांगितली आहे.
Ashadhi Ekadashi वारी
आधी रचिली पंढरी | मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा ।तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागेचे तटी ।धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलीया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी । म्हणुनी अविनाशी पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी ।आम्ही नाचु पंढरपुरी ॥७॥
संत नामदेव महाराजांच्या या अभंगातून पंढरपूरचे प्राचीनत्व अधोरेखित केले आहे. पंढरपूर किती जुने? असा जर कोणी प्रश्न केला तर नामदेव महराज म्हणतात की ते वैकुंठ म्हणजेच स्वर्गाहून जूने आहे. देवाने आधी पंढरपूर आणि मग स्वर्ग निर्माण केला. चंद्र भागा नदी ही स्वर्गातून आलेल्या गंगा नदीहून प्राचीन आहे. आणि अशा या पंढरी नगरीचे भवितव्य काय आहे तर भूमंडळ जरी नाहीसे झाले तरी हे पंढरपूर टिकून राहणार आहे. म्हणजेच पंढरपूर अविनाशी आहे. ते अनादी अनंत आहे. आणि जे अनादी अनंत आहे तेच परमेश्वराचे धाम आहे. म्हणून पंढरपूर हेच देवाचे धाम आहे. अशा या पंढरपुरात जावून प्रत्यक्ष देवीचे दर्शन, आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांच्या दिंड्या पायी पंढरपुरास जातात. या पाई प्रवासाला वारी म्हणतात.
वारीची परंपरा
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीची परंपरा फार प्राचीन आहे. संत ज्ञानदेवांचे वडील विठ्ठलपंत हे आळंदीहून पाई प्रवास करून पंढरपूरला जात असे म्हणतात. त्यावरून वारीची परंपरा ही कमीत कमी आठशे ते हजार वर्षे जूनी असावी असे अनुमान काढता येईल.
१६८५ साली तुकराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण बाबा यांनी देहूहून तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका पालखीत ठेऊन दिंडीसोबत पालखी आळंदी येथे नेली. तेथून त्यांनी त्याच पालखीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका याच पालखीत ठेऊन पालखी पंढरपुरास नेली. तेव्हापासून १८३० साला पर्यंत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानदेव महाराज यांची एकच दिंडी पंढरपुरास जात असे. परंतू पुढे तुकाराम महाराजांच्या कुटुंबात अधिकारावरून वाद होऊ लागल्याने देहू आणि आळंदी येथून दोन स्वतंत्र पालख्या निघू लागल्या. ती परंपरा आजतागायत कायम सुरू आहे. हल्ली दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्र भरातून सुमारे पंचेचालीस पालख्या पंढरपुरास जातात.
वारीतून पाई प्रवासात मुखाने ” ज्ञानदेव तुकाराम. ग्यानबा तुकाराम ” असा गजर करीत सर्व वारकरी लागोपाठ एकवीस दिवस न थकता प्रवास करून पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरात पोहोचतात. महाराष्ट्रातून विवीध ठिकाणाहून निघालेल्या पालख्या संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम महाराज यांचे पालखीत सामील होऊन पुढचा प्रवास करतात. शयनी एकादशीला पंढरपूरला पोहोचलेले भाविक आधी पावित्र तीर्थ भीमा नदीत अंघोळ करून मग दर्शनाला जतात.
वारीचे वेळापत्रक आधीच जाहीर केले जाते. त्यानुसार कधी निघणार, कुठे मुक्काम असणार, सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन, रात्रीचे भोजन यांच्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी होते.
वारीचा मुक्काम सोडताना रोज पहाटे संतांच्या पवित्र पादुकांची पूजा करून त्या पालखीत ठेऊन पुढचा प्रवास सूरू केला जातो. पहाटे सहा वाजता पुढचा प्रवासाला सुरुवात केली जाते. त्याचे आधी तीन वेळा तुतारी फुंकून वारकऱ्यांना सतर्क केले जाते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे व्यवस्थापन हैबतरोबुआ आरफळकर यांचे वंशज व वंशपरंपरागत चोपदार आणि आळंदी देवस्थान ट्रस्ट करतात.
कामिका एकादशी
हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चोवीस एकादशी असतात. या प्रतेक एकादशीस एक विशिष्ठ नाव दिलेले आहे. या प्रतेक नावाचा एक विशिष्ठ अर्थ त्या एकादशीचे महत्त्व विषद करतो. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीस कमिका एकादशी असे नाव आहे. हिंदू धर्मातील धारणेनुसार कामीका एकादशीस खुप महत्व आहे. माणसाच्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचा नाश कामीका एकादशीच्या व्रताचे होते. तसेच सर्व तीर्थांचे स्नान केल्याने किंवा भूदान, गोदान, वस्त्र दान, सुवर्ण दान, रजत दान, अन्न दान केल्यानेही जे पुण्य प्राप्त करता येणार नाही आशा महापुण्याचा धनी हे कामिका एकादशीच्या व्रताने होता येते.
भागवत धर्मात नामस्मरण आणि उपवास हे देवाच्या प्राप्तीचे सोपे उपाय सांगीतले आहेत. ज्यांना वर्षातील सर्व चोवीस एकादशी करणे शक्य नसेल त्यांनी निदान आषाढ महिन्यातील या दोन एकादशी तरी कराव्यात. ज्यांना उपवास करणे शकय नसेल त्यांनी पांडुरंगाच्या चरणी तुळसी पत्र अर्पण करून नामस्मरण करावे. असे केल्याने एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होते.
योगिनी एकादशी
जेष्ठ महिन्याच्या कृष्ण एकादशीस योगिनी एकादशी म्हणतात.
योगिनी एकादशी केल्याने सर्व पापांचा नाश होतो अशी धारणा आहे. या व्रताचे पालन केल्यास घरात सुख शांती नांदून ऐश्वर्य प्राप्त होते. आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन आनंद मिळतो तसेच आयुष्य समृध्द होते.व्रताच्या नुसत्या संकल्पाने यश किर्ती प्राप्त होते. अन्नदानाचे महापुण्य प्राप्त होते. व्याधी रोग दूर होऊन आरोग्य व दीर्घायुष्य प्राप्त होते.
या व्रताची कथा –
अलकापुरीचा राजा यक्षराज कुबेराच्या बागेत हेम नावाचा माळी काम करायचा. मानस सरोवरातील फुले आणून भगवान शंकराची पूजा करणे हे त्याचे नित्याचे काम.
एके दिवशी तो बायकोच्या हट्टामुळे फिरायला गेला. त्यां दिवशी त्याला फुलं आणायला उशीर झाला . त्यामुळे तो कुबेरांच्या सभेला उशिरा पोहोचला. संतापलेल्या कुबेराने त्याला कुष्ठरोगाचा शाप दिला. शापाच्या भयाने परिणामामुळे हेम माळी इकडे-तिकडे भटकत भटकत मार्कंडेय ऋषींच्या आश्रमात पोहोचला. ऋषींनी त्याला योगिनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. माळ्याने योगिनी एकादशीचे व्रत विधिवत पाळले आणि व्रताच्या प्रभावाने त्याचा कुष्ठरोग बरा झाला.
विधी : या व्रताच्या दिवशी उपास करून भगवान विष्णूंची उपासना करावी. त्यांना तुळस व कमळ वाहावे आणि भगवंताचे नामस्मरण करावे . दुसऱ्या दिवशी परमेश्वराचे आभार मानून उपास सोडावा. यथाशक्ती दानधर्म करावा.
Conclusion – Ashadi Ekadashi Information in Marathi
अशा या महापुण्यदाईनी देवशयनी एकादशीच्या उपवासाने, या दिवशी केलेल्या नामस्मरणाने, दान दक्षिणा व व्रत वैकाल्याने मानवी जीवन सुखी होते. संयम शिकवणाऱ्या देवशयनी एकादशीचे महात्म्य तसेच आज आपण कामिका एकादशी व योगिनी एकादशी यांचे महत्त्व जाणुन घेण्याचा प्रयत्न केला. आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये अवश्य सांगा. लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. आणि अजून कोणते विषय तुम्हाला वाचायला आवडतील तेही सांगा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
हे देखील वाचा संत तुकाराम महाराज माहिती मराठी । Sant Tukaram Information in Marathi